प्रसिद्ध संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांचे निधन

प्रसिद्ध संमोहन तज्ञ आणि संमोहन गुरु मनोहर नाईक यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कांदिवली येथील घरी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. मनोहर नाईक यांचा संमोहन आणि जादूच्या प्रयोगांमध्ये हातखंडा होता. देशविदेशात त्यांचे संमोहन शास्त्राचे प्रयोग गाजले. नाईक यांनी गेली पाच दशके संमोहनाच्या क्षेत्रात संशोधन करत, मार्केटिंग आणि ग्लॅमरपासून दूर राहत या क्षेत्राची तपर्श्चर्या केली आणि संमोहनाची विद्या अनेकांना दिली. त्यांच्या निधनाने व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मनोहर नाईक हे मूळचे वेंगुर्ले येथील शिरोडा गावचे. रविवारी मध्यरात्री ते शिरोडा येथून कांदिवली येथील घरी परतले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाईक यांचा योगशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म, हीलिंग, त्राटक आणि ओंकार साधना यांचा दांडगा व्यासंग होता. शास्त्रीय संमोहनाचा अडीच ते तीन तासांचा मनोरंजनाचा कार्यक्रम ते करत. संमोहन शास्त्र, अंधश्रद्धा, स्मरणशक्ती, मनाची एकाग्रता या विषयांवर त्यांची शेकडो शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्याने झाली आहेत. आत्मसंमोहन, संपूर्ण संमोहनशास्त्र या विषयावरचे अभ्यासक्रम ते घ्यायचे. संमोहनावर त्यांनी 45 पुस्तके आणि चार सीडी प्रकाशित केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या