
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 30 मतदारसंघात सरासरी 80 टक्के मतदान नोंदविले गेले, तर आसाममध्ये 47 मतदारसंघात 73 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. हिंसाचाराच्या घटना घडल्या. दरम्यान, तृणमुल आणि भाजपमध्ये आता ऑडिओ क्लीप ‘वॉर’ सुरू झाले असून, दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी तब्बल आठ टप्प्यात मतदान होत आहे. तर आसाम विधानसभेच्या जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. आजचा पहिला टप्पा होता.
आसाममध्ये मतदारांत उत्साह
आसाम विधानसभेच्या 126 जागांपैकी 47 मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान झाले.
72.58 टक्के मतदानाची नोंद झाल्याचा निवडणूक आयोगाचा प्राथमिक अंदाज आहे.
मतदान केंद्रांवर तब्बल 30 हजार केंद्रीय राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आसाममध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे.
पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, विधानसभा अध्यक्ष रिपून बोरासह अनेक उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुविंदु अधिकारी यांच्यात नंदीग्राम मतदारसंघात ‘टफ फाईट’ आहे. प्रलय पाल या भाजप कार्यकर्त्याला ममता बॅनर्जी यांनी फोन करून आपल्याला निवडणुकीत मदत करावी असे सांगत असल्याची ऑडिओ क्लिप भाजपने व्हायरल केली. भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी राज्य निवडणूक अधिकाऱयांची भेट घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून पदाचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार केली आहे.
तृणमुल काँग्रेसनेही भाजपनेते मुकुल रॉय यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. मुकुल रॉय हे शिशिर बाजोरिया या व्यक्तीशी फोनवर बोलताना निवडणूक आयोगाशी संपर्क करून नियमांत बदल करू. यामुळे बाहेरील व्यक्तींना भाजपचे बुथ एजंट बनता येईल असे सांगत आहेत. तृणमुल काँग्रेसने यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगाच्या कामकाजात भाजप हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला आहे.



























































