
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. कोलकात्त्यात सोमवारी भाजपने केंद्रीय मंत्री देबाश्री चौधरी यांच्या उपस्थितीत काढलेल्या रोड शोवर काही लोकांनी तुफान दगडफेक केली. विटा आणि बाटल्याही फेकल्या. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यामुळे राज्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी एकीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करताना भाजपविरोधात दंड थोपटले. त्यानंतर भाजपने कोलकात्ता येथील रासबिहारी अव्हेन्यू आणि चारु मार्पेट परिसरात काढलेल्या रोड शोदरम्यान जोरदार राडा झाला.
काही लोकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक, विटा आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. रोड शोमध्ये केंद्रीय मंत्री देबाश्री चौधरी, सुवेंदू अधिकारी, पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आदी नेते होते. हल्लेखोरांच्या हातामध्ये तृणमूल काँग्रेसचा झेंडा होता. भाजप कार्यकर्त्यांनी काही हल्लेखोरांना पकडून त्यांना बेदम मारहाण केली. दगडफेकीनंतर भाजप व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते परस्परांशी भिडल्याने परिसरातील तणाव आणखीन वाढला.
भाजप कार्यकर्त्यांकडून दुकानांची तोडफोड
दगडफेकीनंतर भाजप कार्यकर्त्यांचाही पारा चढला. त्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करतानाच आसपासच्या परिसरातील मोटारसायकली तसेच दुकानांची तोडपह्ड केली. परिस्थिती फारच हिंसक बनल्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा मागवण्यात आला. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळील मुडियाली क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याआधी गेल्या वर्षी 10 डिसेंबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर विटा आणि दगड फेकण्यात आले होते. या हल्ल्यात अनेक कारचे नुकसान झाले होते. तसेच भाजपच्या काही नेत्यांना दुखापत झाली होती.