मोदींच्या भेटीला ममतादीदी, ‘या’ आहेत दोन प्रमुख मागण्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींच्या राहत्या घरी जावून ममतांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ममता यांनी पंतप्रधान मोदींना कुर्ता आणि बंगाली मिठाईची भेट दिली. या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी मोदींना बंगालमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांचा मंगळवारी 69 वा वाढदिवस होता. या निमित्ताने ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. बुधवारी त्यांनी मोदींच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप-तृणमूलमधील संघर्ष सर्वांनाच दिसला होता. आता या दोन पक्षांमधील कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न ममतांनी केला आहे.

मोदींच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही कोणतीही राजकीय भेट नव्हती. मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे आजची मोदींसोबतची भेट चांगली झाली. बंगालसाठी ममता बॅनर्जी यांनी 13500 कोटी रुपयांचा फंड मागितला आहे. ‘बंगाल’चे नाव बदलून ‘बांगला’ करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली. तसेच यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची इच्छाही व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या