
पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही तासांतच निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी सरकारच्या मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती यांच्यासह राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात दोन टप्प्यांत मतदान होणार असून, २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल, तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या पावलामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या असून, त्यांनी सोमवारी दुपारी ४ वाजता रस्त्यावर उतरून निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयोगाने १९९३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी दुष्यंत नारियाला यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली असून, नंदिनी चक्रवर्ती यांना निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामातून दूर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्याचे पोलीस महासंचालक पीयूष पांडे यांच्या जागी सिद्ध नाथ गुप्ता आणि कोलकाता पोलीस आयुक्त सुप्रतिम सरकार यांच्या जागी अजय कुमार नंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे गृह सचिव जगदीश प्रसाद मीना यांनाही पदावरून हटवले आहे. रविवारी रात्री राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात आयोगाने १९९७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी संघमित्रा घोष यांची गृह आणि पर्वतीय व्यवहार विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाचे सचिव सुजित कुमार मिश्रा यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, ‘बदली केलेल्या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुकीशी संबंधित कोणत्याही पदावर नियुक्त केले जाऊ नये.’
राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हटवण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून तृणमूल काँग्रेसने आज राज्यसभेतून दिवसभरासाठी सभात्याग केला. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले, ‘मध्यरात्री मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि गृह सचिवांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवले आहे. त्यांच्याकडे तसे करण्याचे सर्व अधिकार आहेत, परंतु आम्ही याचा निषेध करतो.’
दुसरीकडे, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे आणि त्यांच्या निर्णयांवर संसदेत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य आणि निरर्थक आहे. तृणमूल खासदार शताब्दी रॉय यांनी असा आरोप केला की, भाजप निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नवीन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्याचा अहवाल सादर करण्यासही आयोगाने सांगितले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत आश्वासन दिले होते की, पश्चिम बंगालमधील निवडणुका हिंसाचारमुक्त आणि शांततेत पार पडतील. याच उद्देशाने बंगालचे पोलीस महासंचालक आणि कोलकाता पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
























































