
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील पूरग्रस्त जलपाईगुडी भागात पाहणीसाठी गेलेले भाजप खासदार खगेन मुर्मू आणि स्थानिक आमदार शंकर घोष यांच्यावर संतप्त स्थानिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही नेते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी भाजप खासदार खगेन मुर्मू आणि आमदार शंकर घोष पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना ही घटना घडली. अचानक मोठ्या संख्येने जमावाने त्यांचा मार्ग अडवला. यावेळी जमावाने ‘परत जा’ अशा घोषणा देत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली आणि दोघांवरही हल्ला केला.
या हल्ल्यात खासदार मुर्मू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते रक्तबंबाळ झाले. त्यांचा गमछा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. तर आमदार शंकर घोष यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव पसरला आहे.
या हल्ल्यासाठी भाजपने तृणमूल काँग्रेसला (TMC) थेट जबाबदार धरले आहे. तर तृणमूल काँग्रेसने आरोप फेटाळून लावले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमधील राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.





























































