उभय संघांना हवाय दुसरा विजय, वेस्ट इंडीज-बांगलादेशमध्ये आज टक्कर

सामना प्रतिनिधी । टॉण्टन

चार सामने… एक विजय… दोन पराजय… अन् एक पावसामुळे रद्द… ही स्टोरी वर्ल्ड कपमधील बांगलादेश व वेस्ट इंडीज संघांची. आता या दोन तुल्यबळ संघांमध्ये उद्या टॉण्टन येथे लढत होणार आहे. याप्रसंगी उभय संघांमध्ये स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी रस्सीखेच लागणार हे निश्चित आहे. याचसोबत स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीही दोन्ही संघ जीवाचे रान करताना दिसतील.

धावांचा पाऊस पडणार

पावसाच्या व्यत्ययामुळे वर्ल्ड कपमधील बरेचसे सामने वाहून गेले. पण उद्या होणार्‍या लढतीत असे चित्र पाहायला मिळणार नाही. प्रखर सूर्यप्रकाशात ही लढत होईल. क्वचित ढगाळ वातावरण असणार आहे. टॉण्टन येथील सीमारेषा जवळ असल्यामुळे दोन्ही संघांतील फलंदाजांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत धावांचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आजची लढत

बांगलादेश वि. वेस्ट इंडीज टॉण्टन, दुपारी तीन वाजता

‘षटकार किंग’ गेलचा अनोखा साज

विंडीजचा धडाकेबाज सलामीवीर आणि षटकार किंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या ख्रिस गेलने हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना चीअर करण्यासाठी अनोखा तिरंगी आणि हिरवी छटा असणारा अनोखा सूट परिधान केलेले आपले छायाचित्र सोशल साईट्सवर टाकले आहे. गेल म्हणतो दोन्ही संघ मला आवडतात. त्यामुळे सुटावर एका हातावर तिरंगी आणि दुसर्‍या हातावर हिरवे पट्टे असलेला सूट मी उभय संघांना चीअर करण्यासाठी परिधान केलाय.