
आज वानखेडेवर शिमरॉन हेटमायरचे वादळ घोंगावले. 34 चेंडूंतील 84 धावांचा तडाखा इतका जबरदस्त होता की वेस्ट इंडीज यंदाच्या वर्ल्ड कपमधील 254 ही सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि त्यानंतर गुडाकेश मोती- अकील होसेनच्या फिरकीसमोर जिगरबाज झिम्बाब्वेचा डाव अवघ्या 147 धावांत संपला. साखळीत चार विजयांसह अपराजित असलेल्या वेस्ट इंडीजने 107 धावांच्या विजयासह आपला विजयोत्सव सुरुच ठेवला. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ विंडीजनेही सलग पाचव्या विजयाची नोंद केली.
शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेलने केलेल्या शतकी भागी आणि अर्धशतकी खेळींच्या जोरावर विंडीजने 254 धावांचा एव्हरेस्ट उभा केला तेव्हाच त्यांचा फाइव्ह स्टार विजय निश्चित होता. जिगरबाज झिम्बाब्वेचा संघ पाठलाग करण्यासाठी उतरला खरा पण विंडीजच्या वेगवान-फिरकी माऱयापुढे त्यांचा निभावच लागला नाही. मॅथ्यू फोर्डने तादिवनाशे मरुमणी विकेट काढत सुरु केलेल्या प्रवासाने अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचताच आपला विजय निश्चित केला. 10 षटकांत 168 धावांचे लक्ष्य गाठणे झिम्बाब्वेला अशक्य होते. तरीही क्रेग इव्हान्सने 9 बाद 103 नंतर 21 चेंडूंत 5 षटकार आणि 2 चौकारांची बरसात करत 43 धावा ठोकल्या आणि संघाच्या पराभवाचे अंतर 107 पर्यंत आणले. इव्हान्सने शेवटच्या विकेटसाठी रिचर्ड नगरवाच्या साथीने 44 धावांची विक्रमी भागी रचली.
हेटमायर-पॉवेलचा घणाघात
शिमरॉन हेटमायरने पुन्हा एकदा शक्तिशाली फटकेबाजी करत रोव्हमन पॉवेलच्या साथीने 122 धावांची भागी रचत संघाच्या अडीच शतकी धावसंख्येचा पाया रचला. 19 चेंडूंत पन्नाशी गाठणाऱया हेटमायरला शतकाची सुवर्णसंधी होती. मात्र त्याचा झंझावात 84 धावांवर थांबला त्याने आपल्या खेळीत 70 धावा चौकार-षटकारानिशी चोपल्या. पॉवेलनेही 59 धावांची फटकेबाजी केली. शेवटी शेरफन रदरफर्डने 13 चेंडूंत 31 धावा खेचत संघाला या स्पर्धेतील 254 ही सर्वोच्च धावसंख्या गाठून दिली.





























































