…अन् त्याने सामना फिरवला! लढतीच्या आदल्या दिवशी कसोटी संघात स्थान

1181

स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमी नाही… गोलंदाजांना चेंडूला थुंकी किंवा लाळ लावायला मिळाली नाही… सेलिब्रेशन नाही… पावलागणिक सामाजिक अंतराचे पालन… या नियमांसह तब्बल 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला तो इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यामधील लढतीने. कोरोनानंतर पहिल्यांदा क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळाला. दोन्ही संघांतील क्रिकेटपटूंनी एकापेक्षा एक सरस खेळ करीत ही लढत ब्लॉकबस्टर ठरवली.

या लढतीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो 32 वर्षीय मध्यमगती गोलंदाज शॅनोन ग्रॅबियल. रिझर्व्ह खेळाडू म्हणून निवड झालेल्या या पठ्ठय़ाला कसोटीच्या आदल्या दिवशी वेस्ट इंडीज संघात स्थान देण्यात आले. त्यानंतर या खेळाडूने चक्क सामनाच फिरवला. पहिल्या डावात इंग्लंडचे चार फलंदाज बाद करणाऱया शॅनोन ग्रॅबियल याने दुसऱया डावातही यजमानांचे पाच फलंदाज बाद करीत वेस्ट इंडीजच्या संस्मरणीय विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. वेस्ट इंडीजने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत आता 1-0 अशी आघाडी घेतलीय.

13 वर्षांनंतर परदेशातील पहिल्याच कसोटीत विजय

वेस्ट इंडीज संघाने तब्बल 13 वर्षांनंतर परदेशातील पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची करामत करून दाखवलीय. याप्रसंगी कर्णधार जेसन होल्डरने संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक केले. तसेच तो पुढे म्हणाला, कसोटीचा चौथा दिवस आमच्यासाठी निर्णायक ठरला. आमच्या गोलंदाजांनी सर्वस्व पणाला लावत गोलंदाजी केली.

त्या निर्णयाचा पश्चात्ताप नाही – बेन स्टोक्स

स्टुअर्ट ब्रॉडसारख्या अनुभवी गोलंदाजाला संघाबाहेर काढल्याचा पश्चात्ताप नाही. आता मी याबाबत असे बोललो तर संघातील इतर खेळाडूंवर अन्याय केल्यासारखे होईल. तसेच संघामध्ये आम्हाला तेज गोलंदाज हवे होते. या लढतीत आमच्याकडून काही चुका झाल्यात, असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यावेळी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या