
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज टी-20 फलंदाज इविन लुईसने आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. केवळ निवृत्ती मागे न घेता लुईसने नऊ वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
याच वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने नाराज होऊन लुईसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, अवघ्या दोन महिन्यांत त्याने आपला विचार बदलला असून वेस्ट इंडिजमधील ‘रिजनल फोर डे कॉम्पिटिशन’ या देशांतर्गत स्पर्धेत त्रिनिदाद संघाकडून खेळण्यासाठी तो उपलब्ध झाला आहे.
9 वर्षांनंतर पुनरागमनाचा प्रयत्न
इविन लुईसने शेवटचा प्रथम श्रेणी सामना 2016-17 च्या हंगामात खेळला होता. त्यानंतर त्याने आपला पूर्ण मोर्चा मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे वळवला होता. आता नऊ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा कसोटी फॉरमॅटच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
प्रथम श्रेणीतील कामगिरी
लुईसने आतापर्यंत प्रथम श्रेणीचे 22 सामने खेळले आहेत. यात त्याने 30.72 च्या सरासरीने 1229 धावा केलेल्या आहेत. 104 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून जमैका विरुद्ध त्याने ही खेळी साकारली होती.
…म्हणून निर्णय मागे घेतल्याची चर्चा
निवृत्ती मागे घेण्यामागे लुईसचा सध्याचा जबरदस्त फॉर्म कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. ‘टीटीसीबी प्रीमियरशिप विभाग 1’ मध्ये त्याने नुकत्याच खेळलेल्या सामन्यात 232 धावांची नाबाद खेळी केली आहे. याशिवाय त्याने 113 आणि 119 अशी शतकेही झळकावली असून, सध्या त्याची स्थानिक दोन दिवसीय क्रिकेटमधील सरासरी 94 इतकी आहे. त्रिनिदादचे प्रशिक्षक रायाद इम्रित यांनी लुईसच्या पुनरागमनाचे स्वागत केले असून, यामुळे निवड समितीसमोर कोणाची निवड करायची असा गोड पेच निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

























































