विंडीजचा विजय; आव्हान शाबूत, दुसऱ्या टी-20मध्ये हिंदुस्थानवर सहज मात

596

वेस्ट इंडीजने दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानवर 8 गडी आणि 9 चेंडू राखून विजय मिळविला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधून मालिकेतील आव्हान शाबूत ठेवले. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या लेण्डल सिमन्सने नाबाद 67 धावांची खेळी केली. हिंदुस्थानी क्षेत्ररक्षकांनी या लढतीतही दोन झेल सोडले. आता मुंबईत होणाऱया तिसऱया लढतीत या मालिकेचा निकाल लागेल.

‘टीम इंडिया’कडून मिळालेले 171 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडीजने 18.3 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 173 धावा करून पूर्ण केले. लेण्डल सिमन्स व इविन लेविस (40) यांनी 73 धावांची सलामी देत विंडीजच्या विजयाची पायाभरणी केली. वाशिंग्टन सुंदरने लेविसला बाद करून ही जोडी फोडली. मग सिमरोन हेथमायर (23) बाद झाल्यानंतर सिमन्सने निकोलस पूरनच्या (नाबाद 34) साथीने तिसऱया विकेटसाठी 61 धावांची अभेद्य भागीदारी करीत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दीपक चहर, युझवेंद्र चहल व रवींद्र जाडेजा हे गोलंदाज महागडे ठरले. जाडेजाने हेथमायरचा बळी मिळविला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 7 बाद 170 धावसंख्या उभारली. लोकेश राहुल (11) व रोहित शर्मा (15) ही सलामीची जोडी आज अपयशी ठरली. खॅरी पियरने राहुलला हेथमायरकरवी झेलबाद केले, तर जेसन होल्डरने रोहितचा त्रिफळा उडविला. मात्र, तिसऱया क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने स्वतःची क्षमता सिद्ध करताना जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने 30 चेंडूत 54 धावांची खेळी करताना 3 चौकारांसह 4 षटकारांचा घणाघात केला. शिवमचे टी-20 क्रिकेटमधील हे पहिले अर्धशतक होय. सलामीच्या लढतीत 94 धावांची नाबाद खेळी करणारा कर्णधार विराट कोहली दुसऱया लढतीत अपयशी ठरला. त्याने 17 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावा केल्या. केसरीक विल्यम्सने विराटला सिमोन्सकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला मोठा धक्का दिला. त्यानंतर रिषभ पंतने 22 चेंडूत 3 चौकार व एका षटकारासह नाबाद 33 धावांची खेळी करीत ‘टीम इंडिया’ला 170 धावसंख्येपर्यंत पोहोचवले. श्रेयस अय्यर (10), रवींद्र जाडेजा (9) व वाशिंग्टन सुंदर (0) यांना अखेरच्या षटकात हाणामारी करता न आल्याने हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या