
उपनगरी रेल्वे मार्गावर प्रवाशांकडून क्यूआर कोड तिकीट बुकिंग सुविधेचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर झाला. याला आळा घालण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांच्या 20 मीटर क्षेत्रात यूटीएस अॅपद्वारे क्यूआर कोड तिकीट बुकिंगची सुविधा बंद केली आहे. प्रवाशांना आता पेपरलेस मोबाईल तिकीट केवळ रेल्वे रुळ व स्थानकांपासून 20 मीटरच्या जिओफेन्सिंग सीमेबाहेर बुक करता येणार आहे.
मागील काही महिन्यांत रेल्वेच्या क्यूआर कोड तिकीट बुकिंग सुविधेचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर झाला. त्यासंदर्भात अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. क्यूआर कोड तिकीट प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा अनेकांकडून उठवला जात होता. त्याची गंभीर दखल घेत पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांच्या 20 मीटर क्षेत्रात ही सुविधा बंद केली आहे. या तिकीट प्रणालीचा गैरवापर सर्वप्रथम 2023 मध्ये उघडकीस आला होता. त्यावेळी एका वेबसाईटचा थांगपत्ता लागला होता. त्या वेबसाईटवर प्रत्येक उपनगरी स्थानकाचे स्टॅटिक क्यूआर कोड होस्ट करण्यात आले होते. ते कोड डाऊनलोड, प्रिंट आणि स्टोअर केले जाऊ शकत होते. त्याआधारे प्रवासी टीसींनी पकडल्यानंतरदेखील ट्रेनमध्ये तिकीट बुक करू शकत होते.


































































