होर्डिंगच्या जाहिरातीतून पाच वर्षांत पश्चिम रेल्वेला 200 कोटींची कमाई, आरटीआयमधून माहिती उघड

मध्य आणि पश्चिम रेल्वेला जाहिरातीद्वारे प्रचंड कमाई होत असते. कमाईच्या बाबतीत मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेला प्रचंड उत्पन्न मिळत असल्याचेही उघडकीस आले आहे. गेल्या पार्च वर्षांत पश्चिम रेल्वेला सुमारे दोनशे कोटींची कमाई झाली आहे. पश्चिम उपनगरात जागेचे दर जादा असल्याने जाहिरातीच्या होर्डिंगद्वारे मिळणाऱ्य़ा कमाईत पश्चिम रेल्वे सहाजिकच मध्य रेल्वेच्या पुढे असल्याची माहिती आरटीआयतून पूढे आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे होर्डिंगची माहिती मागितली होती.  मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक गौरव झा यांनी दिलेल्या माहितीनूसार मध्य रेल्वेला 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षात 39.08 कोटीचे उत्पन्न होर्डिंगमार्फत मिळाले आहे. मध्य रेल्वेला साल 2015-16 मध्ये 5.92 कोटी, साल 2016-17 मध्ये 5.98 कोटी, साल 2017-18 मध्ये 6.60 कोटी, साल 2018-19 मध्ये 9.23 कोटी आणि साल 2019-20 मध्ये 11.35 कोटीची कमाई झाली आहे. अशा प्रकारे एकूण 39.08 कोटी रूपये पाच वर्षांत मध्य रेल्वेला होर्डिंगमार्फत मिळाले आहे.

पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य मंडळाचे अभय सानप यांनी दिलेल्या आकडेवारीनूसार  पश्चिम रेल्वेला साल 2018-19 मध्ये 40.18 कोटी आणि साल 2019-20 मध्ये 54.48 कोटींची कमाई झाली असून पाच वर्षांत एकूण 203.59 कोटीचे उत्पन्न होर्डिंगच्या जाहिरातीतून मिळाले आहे.

माहिती ऑनलाइन करण्यात यावी

बऱ्य़ाच ठिकाणी जाहिरातीकरीता मंजूर केलेल्या जागेपेक्षा अधिक जागेचा वापर केला जातो, परंतु जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत अशी प्रकरणे समोर येत नाहीत. रेल्वे प्रशासनाने अशी माहिती आरटीआयच्या कलम 4 अन्वये ऑनलाइन करावी, जेणे करून व्यवहार पारदर्शक होईल. यासाठी विशेष पथकाची गरज असून तक्रारीची वाट पाहण्याऐवजी अचानक पाहणी केल्यास अनियमितता असल्यास उघड होऊन रेल्वे प्रशासनाचा बुडणारा महसुल वाचेल असे गलगली यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या