पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार, वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त ‘पीट लाईन्स’च्या कामाला वेग

पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्या वाढणार आहे. प्रशासनाने गाडय़ांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले असून वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त तीन ‘पीट लाईन्स’च्या बांधकामाला गती देण्यात आली आहे. हे काम वर्षाअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे आणखी नऊ लांब पल्ल्याच्या गाडय़ांची देखभाल करू शकणार आहे.

रेल्वेकडून वांद्रे टर्मिनस येथील अतिरिक्त तीन ‘पीट लाईन्स’चे बांधकाम युद्धपातळीवर केले जात आहे. सध्या वांद्रेतील टर्मिनसवर तीन ‘पीट लाईन्स’ आहेत. 3500 ते 4000 किलोमीटर अंतर कापून आलेल्या गाडय़ा या लाइन्सवर उभ्या करून धुलाई व इतर तांत्रिक तपासणी केली जाते. ‘पीट लाईन्स’सारख्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याने पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढवण्यास मर्यादा येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.

जोगेश्वरी न्यू टर्मिनस नोव्हेंबरमध्ये प्रवासी सेवेत

जोगेश्वरी येथील न्यू टर्मिनसचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम जवळपास 75 टक्के पूर्ण झाले असून नोव्हेंबरपर्यंत या टर्मिनसवरून लांब पल्ल्याच्या गाडय़ांची प्रवासी सेवा सुरू होईल, असा विश्वास पश्चिम रेल्वे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.