
पश्चिम रेल्वेवरील तिकीट धारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्यासाठी, मुंबई उपनगरीय लोकल सेवा, लोकल, मेल/एक्स्प्रेस, प्रवासी रेल्वेगाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात. जेणेकरून फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होईल.
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकिट तपासणी पथकाने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहीमा राबविल्या. ज्याच्या माध्यमातून 97.47 कोटी रुपये फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आले आहेत. जे गतवर्षाच्या तुलनेत यंदा 42 टक्के जास्त आहे. तसेच रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या टार्गेटपेक्षा 15 टक्के जास्त आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार , सप्टेंबर 2025 मध्ये पश्चिम रेल्वेने वसूल केलेल्या दंडाच्या वसुलीत लक्षणीय वाढ पाहिली आहे. 2.35 लाख तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना शोधून 13.28 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली, ज्यामध्ये बेवारस सामानाच्या केसेसचा समावेश आहे, जी मागील वर्षीच्या सप्टेंबरच्या आकडेवारीपेक्षा 116 टक्के पेक्षा जास्त आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागात 96 हजार केसेस शोधून 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंडाचाही समावेश आहे.
एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा देखील राबवल्या जात आहेत. एसी लोकलमध्ये लक्ष केंद्रित केलेल्या मोहिमेमुळे, एप्रिल ते सप्टेंबर 2025 या कालावधीत जवळजवळ 49 हजार अनधिकृत प्रवाशांकडून दंड करण्यात आला आणि 1.59 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा जवळजवळ 70 टक्के जास्त आहे.