अडीच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, रत्नागिरी पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी मिरजोळे एमआयडीसी परिसरातू ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील अडीच कोटी रुपये किंमतीची अडीच किलो वजनाची उलटी जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले की, व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन मिरजोळे एमआयडीसी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाने काल शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता एमआयडीसी परिसरात सापळा रचून एजाज अहमद युसुफ मिरकर वय 41 रा.मिरकरवाडा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे व्हेल माशाची उलटी सापडली. व्हेल माशाची हि उलटी अडीच किलो वजनाची असून काळ्या बाजारात तिची किंमत अडीच कोटी रुपये आहे.आरोपीकडील 50 हजार रूपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे अशी माहिती देताना पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग सुगंधी द्रव्याचा सुगंध अधिक काळ टिकवण्यासाठी करतात अशी माहिती नितीन बगाटे यांनी दिली. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप ओगले, हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, गणेश सावंत आणि अतुल कांबळे यांनी केली.