Video- व्हाईट व्हेल की रशियाचा हेर? जगभरात चर्चेला उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
white-whale

सामना ऑनलाईन । ओस्लो

अत्यंत दुर्मिळ असा अशा सफेद रंगाचा एक व्हेल मासा नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावर आढळला आहे. मात्र सफेद व्हेल इतकचं त्याचं वैशिष्ट्य नसून तो रशियाचा हेर असल्याची चर्चा आहे यामुळे या माशाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

नॉर्वेतील मच्छिमारांना गेल्या आठवड्यात फिनमार्क येथे एक सफेद रंगाचा व्हेल मासा दिसला. हा भाग रशियाच्या समुद्री सीमेला लागून आहे. निरीक्षणानंतर मच्छिमारांच्या लक्षात आले की बेलुगा जातीच्या या व्हेल माशाच्या गळ्यात एक पट्ट्यासारखे काहीतरी गुंडाळले आहे. बेलुगा व्हेलच्या गळ्याला बांधण्यात आलेल्या पट्ट्यावर इक्युपेमंट ऑफ सेंट पीट्सबर्ग असे लिहिलेले आढळल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे तो मासा मच्छिमारांच्या जहाजाच्या दिशेनेच येत होता. माशाच्या गळ्यातील पट्ट्याला कॅमेरा बांधला होता. हे पाहून सारे आश्चर्यचकीत झाले, अशी माहिती मच्छिमार जोअर हेस्टन यांने दिली. माशाच्या गळ्यातील कॅमेरा दिसल्यावर हा फक्त मासा नसून तो रशियाच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणारा असावा अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आहे.

बेलुगा व्हेल हा व्हेल माशातील सर्वात छोटा आकाराचा मासा मानला जातो. रशियाकडे अनेक प्रशिक्षित व्हेल आहेत. या व्हेलपैकीच काही समुद्रात सोडले असण्याची शक्यता आहे. व्हेलच्या गळ्यातील कॅमेरा हा रशियातील संशोधकांचा नसून तो रशियाच्या नौसेनेचा असण्याची शक्यता असल्याचे वृत्तही प्रसारित झाले आहे.

दरम्यान, हे काही पहिले प्रकरण नाही. या आधी देखील अशा प्रकारे हेरगिरीसाठी समुद्री जीवांची मदत रशियाने घेतली होते. शीतयुद्धादरम्यान रशियाने सबमरीन आणि फ्लॅगमाइन्ससाठी डॉल्फिन माशांचा वापर केला होता. या बरोबरच जहाजांच्या संरक्षणासाठी देखील समुद्री जीवाचा वापर करण्यात आलेला होता.