
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राजकारणात उद्या काय होईल, हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे काही काळ जाऊ द्या, त्यानंतर चर्चा करा, असे ते म्हणाले आहेत. तसेच याआधी विलीनीकरणाबाबत झालेल्या चर्चेबाबत आपल्याला माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणाबाबत आता प्रत्येकजण आपापल्या परीने माहिती सांगत आहे, त्याला काहीही पुरावे, तथ्ये नाहीत. बारामतीत मोठे कृषीप्रदर्शन आहे. त्यासाठी हे सर्वजण एकत्र आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित लढण्याबाबत चर्चा झाल्याने अजितदादांनी आम्हाला सांगितले, होते, त्यापलीकडे काहीही चर्चा झाली नव्हती, असे ते म्हणाले. त्या बैठकीला आमच्यापैकी फक्त अजित पवारच होते, त्यामुळे तिथे काय झाले, ते आम्हाला माहिती नाही.
आता सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री आहेत. आता याबाबत त्या योग्य त्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेतील, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. तसेच आम्ही भाजपप्रणित सरकारमध्ये आहोत. त्यामुळे आम्ही एनडीएमध्येही आहोत. त्यामुळे आता याचे काय करणार होते. आम्ही सरकारमधून बाहेर पडायचे की इतर काही पर्याय होते, याबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे याबाबत चर्चा होणे योग्य नाही. पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत आपण आधीही वक्तव्य केले आहे. राजकारणात पवार का एकत्र येऊ शकत नाही? असे आपण आधीपासून म्हणत आहोत. मात्र, अटीशर्थी, काही होणारे बदल यावर चर्चा होण्याची गरज आहे.
आता विलीनीकरणाबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर, आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट यांना विश्वासात घेत, त्यांचे काय मत आहे ते जाणून घ्यावे लागेल. त्यामुळे राजकारणात उद्या काय होईल, ते कोणीही सांगू शकत नाही. आता सुनेत्राताई योग्य तो निर्णय घेतील आणि आम्ही त्यांच्यासोबत राहू, असेही भुजबळ म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्रीपदाबाबत अनेक तर्कवितर्क आणि चर्चा होत होत्या, प्रसारमाध्यमांमध्येही काही बातम्या प्रेरण्यात येत होत्या. त्यामुळे एकमताने सुनेत्राताई यांची या पदी निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदावरूनही आमच्यात कलगीतुरा लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. आता याबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
























































