
जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेएसस यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी ही खबरदारी घेतली आहे. सोमवारी पहाटे त्यांनी याबाबत ट्विट केले. सध्यातरी माझ्यात कोरोनाचे कुठलेही लक्षण नाही. तब्येत ठीक आहे. मात्र खबरदारी म्हणून डब्ल्यूएचओच्या नियमांचे पालन करून घरातून काम करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना महामारीविरोधात संपूर्ण जगाने उभारलेल्या लढय़ात टेड्रोस यांचा प्रमुख पुढाकार आहे. विषाणूला हरवण्यासाठी आखल्या जाणाऱया प्रत्येक मोहिमेत ते सक्रीय सहभाग घेत आहेत. याचदरम्यान एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वतŠला क्वारंटाईन केले आहे. याबाबत त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कोरोनाला हरवण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे आहे. माझा ज्या एका व्यक्तीशी संपर्क आला, त्या व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मी पुढे काही दिवस घरीच स्वत:ला क्वारंटाईन ठेवणार आहे. याअवधीत डब्ल्यूएचओच्या नियमांचे काटेकोर पालन करीत घरातूनच काम करेन, असे टेड्रोस यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या प्रिन्स विलियमनाही एप्रिलमध्ये झाला होता कोरोना
ब्रिटनच्या प्रिन्स विलियम यांनाही एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. मात्र देशातील जनतेत गोंधळ उडू नये म्हणून त्यांनी बातमी गुप्त ठेवून उपचार घेतले, अशी माहिती पुढे आली आहे. विलियम यांचे 71 वर्षीय वडिल प्रिन्स चार्ल्ससुद्धा एप्रिलमध्येच कोरोनाग्रस्त आढळले होते. ते स्कॉटलंडच्या घरी आठवडाभर क्वारंटाईन राहिले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली. ’द सन’ वृत्तपत्राने ब्रिटनच्या शाही महलमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.



























































