डिबेंचर कपातीसह मुदतवाढीचा डाव टाकणारा तो कोण? ‘गोकुळ’च्या वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण

>> शीतल धनवडे

दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय नाटय़मय घडामोडीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाची माळ पडल्याने ‘गोकुळ’मध्ये महायुतीची सत्ता आल्याचे सांगितले जात आहे; पण विना टेंडर जाजम-घडय़ाळ खरेदीप्रकरण अजूनही मिटलेले नाही तोच आता डिबेंचर कपातीचा मुद्दा पेटला आहे. या कपातीसह त्याच्या मुदतीमध्ये 10 ते 25 वर्षे वाढ करून याद्वारे पद्धतशीरपणे दूध उत्पादकांच्या घामाच्या पैशावर एकप्रकारे डल्ला मारण्यात पुढाकार घेणारा तो सत्तारूढ गटातील स्वयंघोषित अध्यक्ष कोण? दूध संस्थांना आर्थिक अडचणीत आणणारा हा झारीतील शुक्राचार्य कोण? याबाबत ‘गोकुळ’ वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘गोकुळ’ दूध संघाच्या कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढून विरोधकांनी हवा निर्माण केली आहे. भाजपच्याच संचालिका शौमिका महाडीक यांच्या हातात आयताच हा मुद्दा आल्याने त्यांनी सत्तारूढ गटाचीच कोंडी केली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘गोकुळ’चे दूध चांगलेच तापले होते. सत्तारूढ गटाने यंदा दूध दर फरकामध्ये प्रतिलिटर 20 पैशांची वाढ दिली आहे. त्याचबरोबर हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थांना जाजम व घडय़ाळ्याचे वाटप केले. या सगळ्याचा आगामी गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर फायदा व्हावा, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, विना टेंडर तब्बल पावणेचार कोटींचे जाजम खरेदीप्रकरण संचालक मंडळाच्या अंगलट आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी चौकशीचा ससेमिराच पाठीशी लावला आहे. तत्कालीन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी जाहीर निविदा न काढता ही खरेदी केल्याचे समोर येत असून, हा मुद्दा तापलेला असतानाच आता डिबेंचर कपातीवरून ‘गोकुळ’चे राजकारण तापले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर डिबेंचर कपात कायम ठेवणे व त्याची मुदत आहे तशीच 10 वर्षे करणे हे सत्तारूढ गटाला फायदेशीर ठरले असते. मात्र, त्याची मुदत थेट 25 वर्षे करण्यास सांगण्यामागे नवीन संचालक मंडळात आलेल्या सत्तारूढ गटातील एका संचालकाने पद्धतशीरपणे भर घातल्याची चर्चा सध्या ‘गोकुळ’च्या वर्तुळात सुरू आहे. ज्यांनी हे करण्यास भाग पाडले व दूध संस्थांचा रोष ‘गोकुळ’वर ओढवून घ्यावा लागला, त्या दोघांनाच त्याचे स्पष्टीकरण करण्यास पत्रकार परिषदेत संचालक मंडळाने पुढे केले होते. एकूणच या संचालकाच्या हुशारीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘गोकुळ’सह सत्तारूढ गटाच्या नेत्यांची नाचक्की झाल्याचे दिसून येत आहे. ‘आपणाला दूधातील जास्त कळतं’, अशा आविर्भावात वावरणाऱ्या या संचालकांची हुशारी इतर संचालकांच्या अंगलट आली असून, दूध उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतणारा व दूध संस्थांना अडचणीत आणणारा हा झारीतील शुक्राचार्य कोण? याची चर्चा सध्या ‘गोकुळ’च्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

‘त्या’ दोन सत्तारुढ संचालकांना नेत्यांनी झापले?
डिबेंचर प्रकरणात विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा थेट सबंध नव्हता. स्वतःला कधीही परा‘जित’होणार नाही, असे म्हणणारे व आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या ‘त्या’ दोन संचालकांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे; पण हे सगळे प्रकरण अध्यक्ष मुश्रीफ यांच्यावर शेकले. विरोधकांनी काढलेला मोर्चा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिव्हारी लागल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तर अध्यक्षपदासाठी धडपडणाऱ्या या संचालकांनी आपणाला अध्यक्षपद मिळाले नसल्याच्या सूड भावनेतून हा निर्णय घेण्यास भाग पाडले नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

अजूनही अध्यक्षपदाचे डोहाळे
अध्यक्ष निवडीनंतर महायुती म्हणूनच ‘गोकुळ’ची निवडणूक लढवणार, असे नेते सांगत आहेत; पण ही महायुती होऊच नये, असे सत्तारूढ गटातील या संचालकाला अजूनही वाटत असावे, शिवाय अजूनही अध्यक्षपदाचे डोहाळे लागल्याने त्याकडे डोळे लावून बसलेल्या या संचालकानेच महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठीच हे उद्योग केले आहेत का, याचीही चर्चा सध्या सुरू आहे.