Independence Day – स्वतंत्र हिंदुस्थानच्या संघाचे पहिले कर्णधार कोण होते? टीम इंडियाने कोणत्या देशाचा दौरा केला होता?

संपूर्ण देशभरात 79 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या सर्व स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश प्रथम प्राधान्याने केला जातो. हिंदुस्थान आणि क्रिकेट हे एक अतूट नातं आहे. 25 जून 1932 साली टीम इंडियाने आपला पहिला अधिकृत क्रिकेट सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. परंतु तुम्हाला माहित आहे का, टीम इंडियाने 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्या नंतर पहिला दौरा कोणत्या देशाचा केला होता? तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार कोण होतं?

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इफ्तिखार अली खान पटौदी आणि सीके नायडू यांनी टीम इंडियाचं कर्णधारपद भुषवलं होतं. मात्र, 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टीम इंडियाने 1948 साली आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला होता. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधारपदाची मोठी जबाबदारी अष्टपैलू खेळाडू लाला अमरनाथ यांना दिली होती. फलंदाजी, गोलंदाजी आणि गरज पडल्यास यष्टीरक्षणाची जबाबदारी सुद्धा लाला अमरनात पार पाडत होते. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 15 सामने खेळले, परंतु त्यांना फक्त 2 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 24 कसोटी सामने खेळले आणि 878 धावा केल्या. तसेच 45 विकेट सुद्धा त्यांच्या नावावर आहेत. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यांनी दमदार फलंदाजी करत 10 हजारहून अधिक केल्या आहेत.