
जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारच्या आगामी राजकीय भविष्याबाबत आणि संभाव्य मुख्यमंत्र्यांबाबत एक मोठे विधान केले आहे. “बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोणीही होवो, त्याचे प्राधान्य बिहारच्या विकासाला नसून गुजरातच्या चिंतेला असेल,” असे ते म्हणाले आहेत.
प्रशांत किशोर यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सत्ताधारी एनडीएवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जो कोणी मुख्यमंत्री पदावर बसेल, तो दिल्ली आणि गुजरातच्या इशाऱ्यावर काम करेल. बिहारमधील जनतेचे प्रश्न, शिक्षण आणि बेरोजगारी यापेक्षा केंद्रातील नेत्यांच्या मर्जीला अधिक महत्त्व दिले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
प्रशांत किशोर यांनी केवळ भाजपवरच नाही, तर मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि जेडीयूवरही टीका केली. नीतीश कुमार यांनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल टोला लगावताना ते म्हणाले की, “बिहारमध्ये जो पक्ष स्थापन करतो, तो स्वतःच नेता होतो आणि आपल्यानंतर आपला मुलगा वारस असेल, अशी घोषणा करतो. नीतीश कुमार यांचा पक्षही आता त्याला अपवाद राहिलेला नाही.”
यापूर्वीही प्रशांत किशोर यांनी एका सभेत आरोप केला होता की, केंद्र सरकार बिहारमधील जमिनीचा वापर पंजाब, बंगाल आणि गुजरातला जोडणारे मोठे रस्ते बांधण्यासाठी करत आहे. मात्र बिहारच्या मुलांसाठी कारखाने उभारायला येथे जमीन उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. बिहारमधील स्थलांतरित कामगार आता बदल शोधत असून त्यांना केवळ रस्ते नको, तर बिहारमध्येच रोजगार हवा आहे, असेही ते म्हणाले.






























































