
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक कार्यालयात गोंधळ घातला. माझ्याशी पंगा कशाला घेताय, असे म्हणत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना धमकावले. एवढेच नाही तर राठोड यांना असलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेशदेखील त्यांनी सहपोलीस आयुक्तांना दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या कार्यालयात आले होते. त्या वेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि नार्वेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
दरम्यान राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी धमकावून इतर उमेदवारांना अर्ज भरू दिले नाहीत. विरोधी उमेदवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि माजी खासदार राठोड यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नार्वेकर हे राठोड यांच्याशी अत्यंत आक्रमक भाषेत बोलताना दिसत आहेत. माझ्या कार्यालयात येऊन बसता आणि चार कामे करून घेता. जर तुम्हाला सहकार्य करायचे नसेल तर सुरक्षा मिळणार नाही, अशी तंबी नार्वेकर यांनी राठोड यांना दिली.
नार्वेकरांनी फेटाळला आरोप
5 वाजून गेले होते. तिथे काही उमेदवारांचे अर्ज भरणे बाकी होते, त्यांना तुम्ही अर्ज भरायला देणार का असे मी निवडणूक अधिकाऱयांना विचारले. तर त्यांनी वेळ निघून गेल्याने आता अर्ज भरता येत नाही असे सांगितले. तेवढे बोलून मी बाहेर आलो तेव्हा काही जणांनी माझ्याभोवती घोळका केला. माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडून बेकायदेशीर कृत्य करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला मी तयारी दाखवली नाही म्हणून माझ्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत असे सांगत नार्वेकरांनी राठोड यांचे आरोप फेटाळले.
राठोड यांची सुरक्षा काढण्याचे आदेश दिले!
व्हिडिओमधील संवाद धक्कादायक आहे. ‘साहेब आम्ही आंदोलनकर्ते आहोत’ असे राठोड बोलले. त्यावर नार्वेकर हे राठोड यांना तुमचं संरक्षण काढून घ्यायला लागेल असे सांगताना दिसत आहेत. ते एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांना फोन लावून हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा आताच्या आता काढून घ्या, हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे, असे बजावले.




























































