अनैतिक प्रेमात अडथळा ठरत होता, पतीला संपवत घरातच गाडलं; ‘असा’ झाला हत्याकांडाचा उलगडा

अनैतिक प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढत मृतदेह घरातच पुरला. सर्वकाही ठरल्याप्रमाणे सुरू होतं. पण महिलेच्या मोबाईलमधील संशयास्पद मॅसेजने सर्व भांडाफोड झाला. आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नालासोपारा येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील गडगपाडा येथील साई वेल्फेअर सोसायटीतील एका चाळीत आरोपी गुडीया चौहान आणि विजय चौहान हे आपल्या 8 वर्षाच्या मुलासह राहत होते. गुडीयाचे शेजारी राहणाऱ्या मोनू विश्वकर्माशी अनैतिक प्रेमसंबंध होते. या संबंधात गुडीयाचा पती अडथळा ठरत होता. यामुळे गुडीया आणि मोनूने विजयचा काटा काढण्याचा कट रचला.

प्रियकराच्या मदतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला. मग दिराला बोलावून जिथे मृतदेह पुरला होता तेथे टाईल्स बसवून घेतल्या. हत्येला 15 दिवस झाले तरी कुणालाही याबाबत थांगपत्ता लागला नाही. मात्र महिलेच्या मोबाईलमध्ये संशयास्पद मॅसेज आढळल्यानंतर तिची चौकशी केली असता भयंकर घटनेचा उलगडा झाला. यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. पोलीस घरातून मृतदेह काढण्याची प्रक्रिया करत आहेत. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.