देवळाली प्रवरा येथील वाड्या वस्त्यांवर बिबट्याचा वावर वाढला असून परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आता इनाम वस्तीजवळ उदमांजर जखमी अवस्थेत आढळून आली आहे. वन्य प्राण्यांचा मानवी वास्तीत संचार वाढल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. जखमी उदमांजरास राहुरी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा गावठाणालगत असलेल्या इनाम वस्ती येथे जखमी अवस्थेत उदमांजर आढळून आले आहे. स्थानिक नागरिकांना जखमी अवस्थेत उदमांजर आढळल्याने त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाचे बाबासाहेब सिनारे यांनी घटनास्थळी भेट देत जखमी उदमांजराचीपाहणी केली. त्यानंतर त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे, वनपाल आर एस रायकर यांच्याशी संपर्क करून उदमांजराबाबत माहिती दिली. वन खात्याचे कर्मचारी अधिकारी यांना कळविले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन अधिकारी एस एस जाधव, आर आर घुगे, एस एस चव्हाण, ताराचंद गायकवाड यांनी घटनास्ळी धाव घेत जखमी उदमांजराला ताब्यात घेतले. त्याच्यावर दिग्रस येथील रोपवाटीकेत उपचार सुरू करण्यात आले आहे. पशुवैदयकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार झाल्यावर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.