बंगालमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी होऊ देणार नाही, ममता बॅनर्जी यांनी ठणकावले

पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या फेरतपासणीसारखे काहीच राबवू देणार नाही, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाला ठणकावले. भाजपा आणि काँग्रेस तसेच डावे एकत्र आहेत, असेही त्या म्हणाल्या. आमची भाषा आमची ओळख आहे आणि ती दाबण्याचा कोणताही केलेला प्रयत्न आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बंगाली भाषेत बोलणे गुन्हा आहे का?

बंगाली भाषेत बोलणे गुन्हा आहे का? का थांबवले जाते… असा सवाल करत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा बंगाली बोलणाऱयांना भाजप शासित राज्यांत टार्गेट केले जात असल्याचा आरोप आज कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत केला. जर बिहारप्रमाणे बंगालमध्ये बंगाली भाषेला दाबण्याचा प्रयत्न झाला तर तृणमूल काँग्रेस याचा कडाडून विरोध करेल. आम्ही घेराव घालू, कुठल्याही परिस्थिती मते कापू देणार नाही, असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला.