
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आगामी निवडणुकीत लोकांना परिवर्तन घडवायचं आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही असे भाकीत करतानाच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कुणालाच बहुमत मिळणार नाही ,देशात त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
एका खासगी वृत्तवाहिनीशी वार्तालाप करताना शरद पवार यांनी देशातील सत्तापरिवर्तनाचे भाकीत केले . ते म्हणाले ,२००४च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते .त्यावेळी इतर पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे केंद्रात युपीए आघाडीचे सरकार आले आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते . २००४ मध्ये जी परिस्थिती होती त्याचीच पुनरावृत्ती २०१९ मध्ये होणार असल्याचे प्रतिपादन पवार यांनी केले . जगभरात आघाडीची सरकारे सत्तेवर येत आहेत याकडे लक्ष वेधत पवार म्हणाले २०१९च्या निवडणुकीत भाजप नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण प्रत्यक्षात तसे घडणार नाही. केंद्रात सरकारचे नेतृत्व कोण करणार याचा निर्णय निवडणुकीनंतरच निश्चित होईल.
कोणीही पंतप्रधान होऊ शकतो
पंतप्रधानपदाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी खुलासा केला आहे. काँग्रेसला देशात सत्तांतर घडवून आणायचं आहे. त्यामुळे काँग्रेस पंतप्रधानपदाच्या अटीवर अडून बसलेली दिसत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. २००४ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्याचप्रमाणे कोणीही पंतप्रधान होऊ शकतो. कोण होईल हे आज तरी सांगता येत नाही, असेही पवार म्हणाले.
महाआघाडीची चर्चा नाही
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्याशी महाआघाडी करण्याची चर्चा झालेली नाही, असं सांगतानाच वेगवेगळ्या राज्यात तिथले पक्ष भाजपच्याविरोधात एकत्र येतील. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असेल, असं सांगतानाच विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचं काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान बनण्यासाठी आमच्याकडे आकडे नाहीत
तुम्ही पंतप्रधान होणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर आकडे असल्याशिवाय पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहू नये. राजकारणात नेहमीच पाय जमिनीवर असावेत. पंतप्रधान बनण्यासाठी आमच्याकडे आकडे नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मोदी मन की बात करतात , जनकी की बात ऐकत नाहीत
मोदी यांचं व्यक्तिमत्त्व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखं नाही. शक्तीशाली नेते असल्याचं मोदींनी भाजपमध्ये दाखवून दिलं आहे. मात्र देशासाठी ते यशस्वी नेते ठरले नाहीत, असा टोला हाणतानाच मोदींनी स्थिर सरकार दिलं हे मान्यच आहे. पण ते फक्त ‘मन की बात’ करतात, ‘जन की बात’ ऐकत नाहीत. हेच त्यांचं यश आहे, असा चिमटाही पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना काढला
मोदींकडे टीम आहे. पण त्या टीमकडे काम करण्याची क्षमता नाही. त्यामुळेच ते चांगलं काम करू शकत नाहीत. टीम लीडरने नेहमीच आपल्या सदस्यांना काम करण्याची संधी द्यायला हवी. मात्र सध्या तरी तसं दिसत नाही. आज पीएमओकडे आधी फाइल जाते आणि मगच मंत्र्याकडे ती फाइल सह्यांसाठी जाते असेही पवार यांनी म्हटले आहे.




























































