येत्या 7 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. 7 ते 17 सप्टेंबर या 10 दिवसांमध्ये संपूर्ण गणेशोत्सवकाळात प्लाझ्मा, लेझर लाइटवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्णकर्कश आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा दणदणाट रोखण्यासाठी ही यंत्रणा मिरवणुकीत येऊच नये यासाठी नाकाबंदी करून ती रोखणार असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दिली. दरम्यान, ‘ध्वनी’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करून डॉल्बी जागेवर जप्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
शेख यांच्या दालनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संपूर्ण गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या काळात सर्वांनी शांततेने सण साजर करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
8 सप्टेंबर गणपतीचा दुसरा दिवस, 11 सप्टेंबर गणपती उत्सवाचा पाचवा दिवस, 12 सप्टेंबर गौरी विसर्जन दिवस, 16 सप्टेंबर ईद-ए-मिलाद, 17 सप्टेंबर अनंत चतुर्दशी या काळामध्ये ध्वनिक्षेपकांना सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वापर करता येणार आहे. ध्वनिक्षेपकांनी या काळामध्ये औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल, वाणिज्य क्षेत्रात 55 डेसिबल, निवासी क्षेत्रात 25 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 40 डेसिबल मर्यादेतच ध्वनिक्षेपकांचा वापर करावयाचा आहे. यापेक्षा अधिक क्षमतेच्या डॉल्बी या नाकाबंदी करून जागेवरच जप्त केल्या जाणार आहेत. याशिवाय लेझर बीम, प्लाझ्मा या मानवाला अपाय करणऱ्या यंत्रणांना बंदी घालण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील मंडळांनी प्लाझ्मा, बीम लाइट, लेझर बीम लाइटविरहित गणेश मिरवणुका काढाव्यात. अशा लायटिंगमुळे अनेक गणेशभक्तांना अंधत्व आल्याचे वास्तव आहे. गणेश मंडळांनी सर्व परवानग्या घ्याव्यात. तसेच सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी समाजहित उपक्रम राबवावेत यासाठी प्रशासनाकडून अवॉर्डसारख्या संकल्पना सुरू केल्या आहेत.
तडीपारीचे अस्त्र उगारणार
ज्या व्यक्तींवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तसेच उत्सवकाळात यापूर्वी ज्यांच्याकडून कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न झाला आहे, अशा गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यंदा गणेशोत्सवकाळात कमीत कमी 600 जणांना तडीपार करणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख समीर शेख यांनी सांगितले.
डॉल्बी सिस्टीमचा जागेवरच पंचनामा होणार
डॉल्बी सिस्टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला साऊंड ऍनालायजर देण्यात आला असून, त्या माध्यमातून ध्वनिमर्यादेची तपासणी केली जाणार आहे. साताऱ्यात मोठय़ा आवाजाचे डॉल्बी आढळल्यास त्याचा जागेवरच पंचनामा करून संबंधित डॉल्बीचालकांवर खटले दाखल करण्याचा इशारा जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दिला आहे.
मंडळांनी 15 दिवसांचे रेकॉर्डिंग जतन करावे
गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे मंडप परिसरात बसवून त्याचे रेकॉर्डिंग किमान 15 दिवस जतन करावे, गणेशोत्सवामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना दर्शनासाठी स्वतंत्र रांग करण्यात यावी, गणेशोत्सवकाळात टिंगलटवाळी करणाऱ्या रोडरोमिओंवर लक्ष ठेवण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची पाच पथके साध्या वेशात तैनात राहणार आहेत. गणेश मंडळांनी विद्युतरोषणाई करताना चांगल्या दर्जाच्या वायर्सची जोडणी करावी, गणेशमूर्तीच्या संरक्षणाकरिता मंडळाचे कमीत कमी पाच कार्यकर्ते व खासगी सुरक्षारक्षक 24 तास हजर राहतील. याशिवाय पोलिसांचे ‘निर्भया’ पथक यावेळी तैनात राहणार आहे.