थलैवा निवृत्ती घेणार? चाहत्यांना लागली हूरहूर, रजनीकांतच्या कारकिर्दीतील शेवटच्या चित्रपटावरून चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील मेगास्टार रजनीकांत हे गेली अनेक दशके आपले मनोरंजन करत आहेत. देशासह परदेशातही रजनीकांत यांचा फॅन क्लब आपल्याला पाहायला मिळतो. वयाच्या 75 व्या वर्षीही रजनीकांत यांचा जलवा कायम आहे. रजनीकांत यांना दक्षिण भारतात देव मानले जाते. त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा होणं म्हणजे अनेकांसाठी आनंदाची पर्वणी असते.

परंतु गेल्या काही महिन्यांपासून मात्र प्रेक्षकांचा हा सुपरस्टार निवृत्ती घेणार असल्याच्या बातम्या कानी येत आहेत. रजनीकांत सध्या त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट जेलरचा सिक्वेलच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. असे म्हटंले जात आहे की, जेलर २ नंतर ते निवृत्ती घेण्याची घोषणा करणार आहेत. याबाबत अधिकृत वृत्त नसले तरी निवृत्तीच्या बातम्या या जोरदार चर्चिल्या जात आहेत. जेलर २ मध्ये त्यांच्यासोबत तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये मोहनलाल, शिव कुमार, राजकुमार आणि विद्या बालन देखील दिसणार असल्याचे वृत्त आहे.

रजनीकांत यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत कोणतेही अधिकृत विधान अजूनही केलेले नाही. तसेच आगामी काळात रजनीकांत आणि कमल हासन हे दोघेही एकाच चित्रपटात आपल्याला दिसणार आहेत. हे दोघे एकत्र आल्यास, ४० वर्षांनंतर दोघेही एकत्र स्क्रीनवर दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव अजूनही निश्चित झाले नसले तरी, तात्पुरते नाव हे थलायवा 174xKH238 असे असणार आहे.

वलाई पेचूच्या वृत्तानुसार, रजनीकांत शेवटच्या चित्रपटामध्ये मुलीसोबत काम करणार आहेत. खास निवृत्तीसाठी सौंदर्या रजनीकांत या रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत किंवा निर्माती असणार आहे असे म्हटले जात आहे.