
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर विचित्र हवामानाचा अनुभव घेत आहेत. पहाटे आणि रात्री गारवा तर दुपारी कडक ऊन असे वातावरण आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या आजारांनी मुंबईकर हैराण आहेत. उकाडा आणि आजार या कात्रीत सापडलेल्या मुंबईकरांना आणखी आठवडाभर थंडीची वाट बघावी लागणार आहे. कारण, 17 नोव्हेंबरपासून मुंबईसह महाराष्ट्रात थंडी खऱ्या अर्थाने दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या राजस्थानवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस कडक ऊन जाणवत आहे. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे, परंतु 17 नोव्हेंबरपासून हवामानात बदल होईल आणि जम्मू-कश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा जोर आणखी वाढेल. परिणामी, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीही जोर धरेल अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी दिली. नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपला तरीही पावसाचे ढग महाराष्ट्रावर घोंघावत आहेत. नोव्हेंबरमध्ये थंडी दाखल होते पण यंदा पावसाचा अनुभव प्रत्येकजण घेत आहे. लवकरच हे चित्र बदलेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
- मुंबईत सोमवारी सांताक्रुझमध्ये 22 डिग्री सेल्सियस तर कुलाब्यात 23 डिग्री सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
- राज्यात सर्वात कमी तापमान नगर येथे 14.0 डिग्री सेल्सियस इतके होते.
- गेल्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात हवामान कोरडे होते.
























































