
सोनई येथील संजय वैरागर या दलित युवकास 19 ऑक्टोबर रोजी अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणात गावातीलच सवर्ण वर्गातील 11 जणांवर खोटी ॲट्रॉसिटी व बोगस गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज येथील व्यापारी व गावातील सकल हिंदू समाजाच्या वतीने सोनई पोलीस ठाण्यावर मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सोनई शहरातील व्यापारी व पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने सामील झाले. दुपारी एक वाजेपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला. या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
संजय वैरागर या युवकाला दिवाळी सणात अमानुष मारहाण करून जबर जखमी केले. या प्रकरणात दलित समाजाने आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी पोलीस प्रशासनाविरोधात घोडेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. शिवाय सोनई पोलीस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला होता. या मारहाण प्रकरणात सवर्ण समाजातील अकराजणांवर ऍट्रॉसिटीसह खोटे व बोगस गुन्हे दाखल करून शहरात दलित-सवर्ण वाद निर्माण केला गेला.
संजय वैरागर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, सोनई शहरात अनेकांना मारहाण करून चाकू हल्ले व खंडणी गोळा करण्याचे उद्योग करत आहे. याचा बंदोबस्त करावा, यासाठी आज सोनईतील व्यापारी व हिंदू सकल समाजाने सकाळी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून या युवकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सवर्ण समाजातील 11 जणांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चात महिला व युवकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सरपंच कानिफनाथ येळवंडे, अनिल शेटे, पोपट आघाव, दत्तात्रय गडाख, वने मॅडम आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. खोटे गुन्हे मागे न घेतल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या कार्यालयावर काढण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना निवेदन देण्यात आले.
































































