मंगळसूत्र घेऊन महिलेला दिले पिवळे धातूचे मणी, चोरट्या महिलांना 24 तासांत अटक

सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे पिवळे धातू सोनेच असल्याचे भासवून परराज्यातील चोरट्या महिलांनी एका महिलेची फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आंबेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चोरट्या महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २ हजारांचे मंगळसूत्र जप्त केले आहे. ही घटना 15 ऑक्टोबरला दुपारी सव्वाएकच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरातील साई मित्रमंडळासमोर घडली होती.

आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय 50, सासवड, पुणे मूळ रा. ढोला झोपडपट्टी, भावनगर, गुजरात) आणि सोनू बेन आकाशभाई सरवय्या (वय 30, गुजरात) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. तक्रारदार महिला 15 ऑक्टोबरला कात्रजमधील संतोषनगरात होती. त्यावेळी दोन्ही चोरट्या महिलांनी तिला पिवळ्या धातूचे मणी दाखविले. तुमच्या गळ्यातील मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे मणी असून, आम्हाला गावी जायचे आहे, सांगून महिलेला बतावणी केली. तिचा विश्वास संपादित केल्यानंतर चोरट्यांनी तिला पिवळे धातूचे मणी देऊन एक लाखांचे मंगळसूत्र चोरून नेले. मंगळसूत्र चोरीप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाने कात्रज ते सासवड मार्गातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, नीलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, सुभाष मोरे, हरीश गायकवाड, राकेश टेकवडे, मपोशि दीक्षा मोरे यांनी केली.