
विवाहितेच्या छळ प्रकरणात दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्रात आरोपीला फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठविण्यासाठी महिला पोलीस हवालदारानेच लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने 30 हजारांची लाच स्वीकारताना या महिला हवालदाराला रंगेहाथ पकडले. तसेच, सहायक फौजदारावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई रावेत पोलीस ठाणे येथे शुक्रवारी (दि. 18) करण्यात आली.
रावेत पोलीस ठाण्यातील राजश्री रवी घोडे असे लाचखोर महिला हवालदाराचे नाव आहे. तर, राकेश शांताराम पालांडे असे सहायक फौजदाराचे नाव आहे. या प्रकरणात तक्रारदार वकील असून त्यांच्या अशिलावर रावेत पोलीस ठाण्यात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास राजश्री घोडे यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच त्याच्याविरुद्ध दाखल होणाऱ्या दोषारोपपत्रात आरोपीस फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठविण्यासाठी राजश्री घोडे यांनी तक्रारदाराकडे 50 हजारांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता राजश्री घोडे यांनी सुरुवातीस 50 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30 हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, राकेश पालांडे यांनी राजश्री घोडे यांना लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिल्याचेही निष्पन्न झाले.
त्यानुसार, एसीबीच्या पथकाने सापळा रचला. राजश्री घोडे यांना रावेत पोलीस ठाण्यात 30 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर, पालांडे यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.