नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. बेलापूर जवळील निपाणी वडगाव शिवारात एका महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ती महिला मतिमंद मुलांसह निपाणी वडगाव शिवारात वास्तव्यास होती. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निपाणी वडगाव शिवारात दोन कुटुंबात काही शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. एका गटाने कोयता कुऱ्हाडीच्या सहाय्याने दुसऱ्या कुटुंबास मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. या भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.