
कातकरी समाजातील अल्पवयीन जबरदस्तीने लग्न लावण्याचा कट ग्रामस्थ आणि महिला बालविकास आधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे उधळला. शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरे (शेणवा) गावात ही घटना घडली. हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच पथकाने धाड टाकून बाल विवाह रोखल्यामुळे एका चिमुरडीचे भावविश्व उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.
पीडित अल्पवयीन मुलीचे वडील दत्तात्रेय वातेस यांनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दलाल प्रकाश मुकणे यांच्या मध्यस्थीने मुलीचे लग्न जय शिर्के (अहिल्यानगर) याच्याशी ठरवले होते. या व्यवहारात मुलीच्या बदल्यात पालकांना 50 हजार देण्याचे ठरवून आदिवासी त्यातील 10 हजार रुपये एक महिन्यापूर्वी मुलीचा देण्यात आले होते. 5 ऑक्टोबर रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांना ही खबर मिळताच त्यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक नितीन खैरनार, जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या बाल मदत केंद्रातील स्वीटी टॉनी जोसेफ यांच्यासह पोलीस पथकाने खैरे गावात धडक दिली. या पथकाने बालविवाहाचा कट उधळला. याप्रकरणी जय शिर्के, लक्ष्मण शिर्के (दोघेही बाबुलवाडी, जुन्नर,) दत्तात्रेय वातेस, प्रकाश मुकणे (मळेगाव, शहापूर) यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.
कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणामुळे आदिवासी कातकरी समाजातील गरीब कुटुंबांना फसवून मुलींची खरेदी-विक्रीसारखी घृणास्पद पद्धत उघड झाली असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.