विमानातून प्रवास करताना एक महिलेने दोन सहप्रवाशांवर हल्ला केला आहे. तसेच एका CISF महिला शिपायाचा चावा घेतला आहे. पुण्यात ही घटना घडली असून या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील लोहेगाव एअरपोर्टवरून दिल्लीसाठी विमान निघाले होते. तेव्हा एक महिला आपल्या पतीसोबत त्या विमानात गेली. तेव्हा एक बहीण भाऊ आपल्या मिळालेल्या सीटवर बसले होते. या सीटवरून या महिलेने या दोघांशी वाद घातला. त्यानंतर महिलेने या दोघांवर हल्लाही केला. तेव्हा केबिन क्रूने CISF च्या दोन महिला कॉन्स्टेबलला बोलावलं. ही महिला या कॉन्स्टेबलशीही वाद घालू लागली. त्यानंतर महिलेने कॉन्स्टेबल प्रियंका रेड्डी यांच्या कानशिलात लगावली आणि जोरदार चावा घेतला.
पायलटने या महिलेला दिल्लीला घेऊन जाण्यास नकार दिला. त्यानंतर या महिलेला पुन्हा एअरपोर्टवर आणले गेले आणि तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही महिला गृहिणी असून तिचा पती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराठी हे जोडपं पुण्याहून दिल्लीला निघालं होतं.