
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता देण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्याचा थेट उद्रेक भंडारा जिह्यात पाहायला मिळाला. शनिवारी सकाळी संतप्त लाडक्या बहिणींनी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात महिलांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही वेळातच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. अचानक झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांसह खासगी वाहने अडपून पडली. प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लवकरच खात्यात पैसे जमा करू असे आश्वासन त्यांनी दिले.





























































