
अनुभवी ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पी हिला इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुख हिने रविवारी झालेल्या दुसऱया रंगतदार क्लासिकल लढतीतही बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. त्यामुळे आता या स्पर्धेचे विजेतेपद सोमवारी होणाऱया रॅपिड-ब्लिट्झ टाय-ब्रेकद्वारे निश्चित होणार आहे.
दोन्ही खेळाडूंनी क्लासिकल फॉरमॅटमधील दोनही डाव अनिर्णित राखले असून अंतिम लढतीसाठी आता वेगवान फॉरमॅटमध्ये भिडणार आहेत. दुसऱया डावात पांढऱया प्याद्यांसह खेळणाऱया कोनेरू हम्पीने स्थिर आणि नियंत्रित सुरुवात करत खेळावर आपली पकड ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, दिव्याने अत्यंत शांत आणि आत्मविश्वासाने प्रत्युत्तर देत हम्पीच्या प्रारंभीच्या आक्रमणाला थोपवलं. मध्यंतरानंतर उभय खेळाडूंनी नियमितपणे मोहरे देवाण-घेवाण करत स्थिती सुलभ करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंना निर्णायक आघाडी मिळत नसल्याने कोणतीही खेळाडू अनावश्यक जोखीम पत्करण्याच्या मनŠस्थितीत नव्हती, हे स्पष्ट झाले. शेवटी सामन्याने एका ‘चालींच्या पुनरावृत्ती’च्या स्थितीत प्रवेश केला. म्हणजे या स्थितीत एकसारख्या चाली पुनः पुन्हा केल्या जातात आणि नियमांनुसार अशा स्थितीत सामना बरोबरीत संपतो. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. आता सोमवारी होणाऱया टाय-ब्रेक सामन्याच्या निकालाकडे तमाम बुद्धिबळ जगताच्या नजरा लागलेल्या असतील.





























































