
पाथर्डी-अहिल्यानगर एसटी बसमध्ये बसलेल्या चार महिलांचा जागेवरून वाद होत आपसात मारामारीचा प्रकार घडला. वाद आणखी विकोपाला जाऊ नये म्हणून वाहकाने एसटी पोलीस स्टेशनला आणली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांसमोरच या महिलांमध्ये हाणामारी झाली. अखेर चारही महिलांना पोलिसांनी अटक केली.
अर्चना कांदे चव्हाण (रा. साकेगाव, ता. पाथर्डी) या तिची आई लता भोसले (वय 50) यांच्यासोबत पाथर्डी बसस्थानकातून अहिल्यानगरकडे निघाल्या होत्या. बसमध्ये बसल्यानंतर जागेवरून त्यांचा वाद मेघा संजय भोसले (रा. आगासखांड, ता. पाथर्डी) यांच्याशी झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर वाहकाने बस पोलीस स्टेशनमध्ये आणली. मात्र, तेथेही त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत पोलीस स्टेशनला अगोदरच उपस्थित असलेल्या वाळुबाई काळे यासुद्धा सहभागी झाल्या.
या नंतर महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वडते, मनीषा धाने, चंद्रावती शिंदे व सुरेखा गायकवाड यांनी हे भांडण सोडविले. परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी चारही महिलांना अटक केली.


























































