स्त्रियांचे मानसिक आरोग्य

1256

>> वर्णिका काकडे

10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. 1982 पासून हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ झाला. मुळात मानसिक आरोग्य नावाची काय गोष्ट असते हेच अनेकांना माहीत नसते किंवा मानसिक आरोग्याविषयी वेगळा विचार करायला हवा हेच अजून आपल्या मनात रुजलेले नाही.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यात शारीरिक आजारांसोबत मानसिक आजारांचे वाढलेले प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. नैराश्य, ऑटिझम, डायमेंशिया, बायोफ्लोर, डिप्रेशन, न्यूरोटीक, स्क्रिझोफेनिया असे न माहीत असलेले आजार जडतात. त्यामुळे या सर्व मानसिक आजारांबाबत माहिती आणि जनजागृती आणखी वाढली पाहिजे. ही जागरूकता काही अंशी घडत असली तरी स्त्रियांमधील मानसिक आजारांकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्याची महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची स्थिती चिंताजनक म्हणावी अशी आहे. आपल्याच लोकांकडून होणाऱया अमानकीय वर्तनामुळे स्त्रियांच्या मानसिक आरोग्याची फार मोठी हानी होत असलेले सध्याचे चित्र आहे.

‘जागतिक आरोग्य संघटने’च्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानमध्ये दर पाच महिलांपैकी एक महिला तर दर 12 पुरुषांपैकी एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतो. यावरून मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसून येतेय. संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्क आहे हे नाकारून चालणार नाही. मात्र आज आपल्या देशातील महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य ही चिंतेची आणि चिंतनाची बाब बनली आहे.

ग्रामीण भागामध्ये तर ही स्थिती आणखी वाईट आहे. शहरात राहणाऱया स्त्रियांची स्थितीही फारशी चांगली आहे असे नाही. आधुनिक काळातील महिला घर आणि नोकरी, व्यवसाय अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत असते. घरातील अनेक कामांची जबाबदारी तिचीच असते. सतत जबाबदारीच्या आणि कामाच्या ओझ्याखाली राहिल्याने मानसिक नैराश्य, भीती, चलबिचल होणे अशी साधारण लक्षणे सर्वच महिलांमध्ये दिसून येतात. विविध पातळीवरील जबाबदारी निभाकताना त्या मानसिक स्तराकर हळूहळू कमकुकत होत जातात आणि परिणामी मानसिक आजाराला बळी पडतात. शहरांमध्ये राहणाऱया नोकरदार महिलांमध्ये मानसिक तणाक आणि नैराश्य जास्त प्रमाणात पाहायला मिळते. घर आणि ऑफिसमध्ये जबाबदारी पार पाडण्याचा दबाक त्यांना नैराश्य आणि मानसिक तणावाची शिकार बनवतो.

हे काही केवळ शहरातल्या स्त्रीबाबत घडते असे नव्हे तर ग्रामीण महिलांनाही अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. देशाच्या ग्रामीण भागामध्ये तर स्थिती यापेक्षाही काईट आहे. ग्रामीण भागात याबाबत जागरूकतेची उणीव असल्याने अशा महिला आपसूकच भोंदूबाबा, हकिमांच्या जाळय़ात फसतात. शिवाय तिथे उपचारही तिळणेही दुर्लभ. यामुळेच अशा महिलांना उपचार मिळेपर्यंत त्यांचा आजार खूप वाढलेला असतो. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे कौटुंबिक सहयोगाचाही अभाव. अर्थात त्या त्या आजाराबाबतची माहिती हीदेखील तितकीच अभावाची गोष्ट आहे.

मानसिक आरोग्यातील अस्वस्थता वाढत चालली आहे. हिंदुस्थानातील किमान 13.7 टक्के व्यक्ती त्यांच्या आयुष्यात मानसिक आजाराने पीडित असतील असा अंदाज आहे. सर्व साधारणपणे स्त्रियांना पुरुषांच्या दुप्पट प्रमाणात मानसिक आजार होण्याची अधिक शक्यता असते. ही तफावत असण्याच्या काही कारणात हार्मोन्स, शरीरशास्त्र यांचा समावेश असला तरी अंतर्भाग असण्याची शक्यता असली तरी आपल्यावर असलेला संस्कृतीचा पगडा आणि लिंगभेद ही महत्त्वाची कारणे आहेत.

स्त्रियांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर काही नेमके बदल होत असतात. मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे, या टप्प्यांवर काही स्त्रियांना विशिष्ट मानसिक आजार होतात. त्यांना ‘स्त्रियांमधील मानसिक आजार’ असे म्हटले जाते. या टप्प्यांवर स्त्रियांना लहान कालावधीत मोठे शारीरिक, मानसिक व सामाजिक बदल स्वीकारावे लागतात. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते. स्त्रियांचे स्त्रीत्त्व अधोरेखित करणारे दोन हार्मेन्स म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. गर्भधारणेच्या अवयवांचे आरोग्य आणि कार्य हे हार्मोन्स पार पाडतात. अर्थातच या हार्मोन्सचे कार्य केवळ या अवयवांपर्यंत राहत नाही. शरीरातील प्रत्येक बाब मेंदूशी निगडित असल्याने या हार्मोन्सचाही मेंदूवर परिणाम होतो.

विशेषत: स्त्रियांचा कल स्वतःचा कोणताही आजार क्षुल्लक समजण्याकडे असतो. शिवाय याबाबतची अपुरी माहिती देण्याकडेही कल असतो. महिला आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेत असतात. पण इतरांच्या आरोग्याची देखभाल करणाऱया या महिला स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत असतात. हैराण करणारी बाब म्हणजे त्यांच्या या त्यागाकडे घरातील लोकही दुर्लक्ष करतात. महिलांना दुय्यम दर्जा देण्याची किचारधारा त्यांच्या आरोग्याबाबतही लागू होते. या महिला आपल्या शारीरिक आणि मानसिक अडचणींबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाहीत. परिणामी, त्यांच्यावर योग्य वेळी उपचार केले जात नाहीत.

देश स्तरावर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ची योजना राबवून महिलांना सक्षम करण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले जात आहेत; परंतु मनोरुग्ण महिलांच्या बाबतीत मात्र वास्तव काही वेगळेच आहे. देशभरातील मानसिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या चारपैकी एका महिलेला तिचेच कुटुंबीय नाकारत असल्याचे वास्तव आहे. अनेक जणी नवऱयाने शासकीय रुग्णालयात दाखल करून नंतर हात झटकल्याने निराधार, निराश्रित होतात. त्यांचे शोषणही होत राहते. उपचाराचा खर्च न परवडणे आणि मनोरुग्ण महिलांची देखभाल करणे अतिशय अवघड असल्याने नातेवाइकही त्यांना परत नेण्यासाठी इच्छुक नसतात. अनेक जणांनी तर चुकीचा पत्ता दिल्याने मनोरुग्ण महिलांना आरोग्य केंद्रातच राहावे लागत असल्याचे चित्र आहे. मानसिक आजाराबद्दल समाजात ज्या गैरसमजुती आढळतात त्या दूर व्हायला हव्यात. मात्र त्यासाठी ठोस पावलेही उचलली गेली पाहिजेत.

मानसिक आजारपण आणि मानसिक ताणतणाव यामुळे आपल्या आयुष्यातील आनंद हिरावून घेतला जातो. जगण्यातील उमेद कमी होते याचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे. म्हणूनच जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेषत: स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करूया व प्रत्येक क्षण सोन्याचा करूया.

आपली प्रतिक्रिया द्या