मिंधे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघातील मतदार, गाव- वाड्यांमधील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. मिंधे गटातील काहींनी या भागातील अनेकांच्या जमिनी, घरे विकली आहेत. नोकऱ्यांअभावी तरुणही बेरोजगार राहिले. या सर्वांचे पडसाद नुकत्याच झालेल्या महिला बचत गटांच्या मेळाव्यात उमटले. केवळ निवडणुकीपुरते मतदारांना झुलवणाऱ्या महायुतीला आगामी निवडणुकीत धडा शिकवण्याचा एकमुखी आवाज या महिला मेळाव्यात घुमला.
रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशन पुरस्कृत ‘लेक शिवबाची’ अंतर्गत भव्य महिला संवाद मेळावा साळाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ म्हणाल्या, नोकऱ्या मिळाव्यात यासाठी तरुणांनी आमदारांकडे बायोडेटा दिला. परंतु त्यांनी तो बायोडेटा उघडून बघितलाच नाही. त्यामुळे येथील असंख्य तरुण बेरोजगार आहेत. या भागातील अनेकांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी लढत आहेत. मात्र त्यांना न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे महायुतीला धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, सरपंच रश्मी पाटील, साम्या कोरडे, नीता गिदी, सोनाली मोरे, प्रियांका चुनेकर, भारती बंदरी, सोनाली कासार, प्रीती नलावडे उपस्थित होते.
न्याय्य हक्काची लढाई
महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. अल्पवयीन मुलींपासून महिलांवर अत्याचार होत आहेत. तरीही मिंधे सरकार दोषींवर कारवाई करत नसल्याचा संताप राजश्री मिसाळ यांनी व्यक्त केला. आपल्या न्याय्य हक्कासाठी ही लढाई मतदानातून लढायची आहे. आता बदला घेण्याची वेळ आली असून आमदारांना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.