गुजरातमध्ये महिला असुरक्षित, गुन्हेगारांना सरकारकडून मिळत आहे संरक्षण; राहुल गांधी यांची भाजपवर टीका

गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची ‘जन आक्रोश यात्रा’ सुरू आहे. राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या गैरवापराचा, अवैध दारू विक्री आणि वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने २१ नोव्हेंबर रोजी ‘जन आक्रोश यात्रा’ सुरू केली आहे. यावरूनच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

X वर एक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, “गुजरातमध्ये काँग्रेसच्या सुरू असलेल्या जनआक्रोश यात्रेदरम्यान लोकांनी, विशेषतः महिलांनी, वारंवार सांगितले आहे की, राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांचे व्यसन, अवैध दारू आणि गुन्हेगारीमुळे त्यांच्या जीवनात असुरक्षितता वाढली आहे. गुजरात ही महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी आहे, जिथे सत्य, नैतिकता आणि न्यायाची परंपरा आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्यातील तरुणांचे भविष्य अंमली पदार्थ आणि गुन्हेगारीच्या अंधकारमय जगात ढकलले जात आहे.”

ते म्हणाले की, “गुन्हेगारांना सत्तेकडून संरक्षण मिळत असल्याने महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत. गुजरात विचारत आहे की, भाजप सरकार गप्प का आहे? भाजपचे मंत्री कोण आहेत ज्यांच्या संरक्षणाखाली हे सर्व घडत आहे? गुजरातच्या गद्दारांना का संरक्षण दिले जात आहे?”