
राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एपूण 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र यंदा मुंबईतील चित्र जरा वेगळे आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे. यात 821 पुरुष उमेदवार तर 879 महिला उमेदवार आहेत. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे सर्वपक्षांनी महिलांना मोठय़ा संख्येने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
प्रभागनिहाय उमेदवार महिलांची संख्या
देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी – 68
वडाळा, दादरचे प्रभाग, शीव – 66
धारावी, माहीम, दादरजवळील काही भाग – 59
अंधेरी पूर्व – 56
घाटकोपर – 51
भायखळा, चिंचपोकळी, रे रोड – 50
अंधेरी पश्चिम – 46
भांडुप – 45
मालाड – 42
मुलुंड – 37
कुर्ला – 35
वरळी, प्रभादेवी परिसर – 34
आरक्षणाचा दिग्गजांना फटका
मुंबई महापालिकेतील आरक्षण पद्धतीचा दिग्गज उमेदवारांना फटका बसला आहे. मागील निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती. साडेतीन वर्षे मुंबई महापालिकेची निवडणूकच झाली नाही. यंदा पूर्णपणे नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण पद्धतीचा मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांतील अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका बसला आहे. नवीन प्रभाग आरक्षण सोडतीमुळे यंदाच्या निवडणुकीत एकाच वॉर्डमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवार देण्यात आले आहेत. 453 महिला उमेदवारांनी माघार घेतली आहे.
महिलांची संख्या वाढली
आरक्षण सोडतीनंतर माटुंगा, शीव, वडाळा या प्रभागात महिलांची संख्या आठ झाली आहे, तर पुरुष उमेदवारांची संख्या दोन आहे. 10 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवक महिला असतील. आरक्षण बदलामुळे अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्व या प्रभागात एपूण 15 नगरसेवकांपैकी 11 महिला नगरसेवक होणार आहेत. ‘आर मध्य’ बोरिवली भागातील प्रभागात नगरसेवकांची संख्या 10 आहे. नवीन आरक्षण सोडतीनंतर या वॉर्डमधील महिला उमेदवारांची संख्या 8 झाली आहे.




























































