हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात संडे ब्लॉकबस्टर, महिला टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर

आयसीसीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे नवीन वेळापत्रक जाहीर केले असून हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन्ही संघांना संडे ब्लॉकबस्टरसाठी पुन्हा एकदा एकाच गटात ठेवण्यात आले आहे. दसऱ्यानंतर म्हणजेच 6 ऑक्टोबरला हे दोन्ही कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडतील.

महिलांचा टी-20 वर्ल्ड कप आधी बांगलादेशमध्ये होणार होता, पण तेथील राजकीय परिस्थितीमुळे तो यूएईला हलवण्यात आला. आधीही ती स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबरदरम्यानच खेळविली जाणार होती तर आताही त्याच तारखेला स्पर्धेचे दुबईत आयोजन केले जाणार आहे. फक्त काही लढती आयसीसीने मागे पुढे केल्या आहेत.

हिंदुस्थानी महिला संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीने 4 ऑक्टोबरला आपल्या अभियानास प्रारंभ करेल. याआधी हिंदुस्थानी संघ दोन सराव सामनेही खेळणार आहे. 2020 चा उपविजेता हिंदुस्थान, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह सहा वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. याचबरोबर 2016च्या चॅम्पियन वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे.

श्रीलंका आणि स्कॉटलंड या वर्षाच्या सुरुवातीला अबुधाबी येथे झालेल्या आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 20 ऑक्टोबरला दुबईत होणार आहे. त्याआधी 17 ऑक्टोबरला पहिला उपांत्य सामना दुबईत, तर 18 ऑक्टोबरला दुसरा सामना शारजात होईल. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस निश्चित करण्यात आला आहे.

टी-20 वर्ल्ड कपची गटवारी

‘अ’ गट ः ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका.
‘ब’ गट ः दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड.