देवरूख- मार्लेश्वर रस्त्याचे काम 19 एप्रिलपासून सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्लेश्वर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत हातीव येथील रूपेश कदम आज सकाळी मार्लेश्वर-तिठा येथे उपोषणाला बसले होते. या उपोषणाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पूजा इंगवले यांनी घेतली. त्यांनी उपोषणस्थळी दाखल होत उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या चर्चेनंतर येत्या 19 एप्रिलपासून देवरुख-मार्लेश्वर रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात केली जाईल, अशा आशयाचे पत्र देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती उपोषणकर्त्यांना केली. यानंतर रूपेश कदम व सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी संबंधित विभागाने उपोषणाची तातडीने दखल घेतल्याने मार्लेश्वर दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे रूपेश कदम यांनी सांगितले.

गेले अनेक महिने या रस्त्याच्या डागडुजीबाबतीत पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जात नव्हते, यामुळे रूपेश कदम उपोषणाला बसले होते. त्यांच्या या उपोषणाची सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंता पूजा इंगवले यांनी पहिल्याच दिवशी दखल घेत उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. येत्या 19 एप्रिलपासून देवरूख-मार्लेश्वर रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते व बंडू सुर्वे यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू झाले त्या रूपेश कदम यांना सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले.

या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, समविचारी मंचचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष मनोहर गुरव, अन्य सुज्ञ मंडळींनी पाठिंबा दर्शवला होता. या सर्वांचे रूपेश कदम यांनी आभार मानले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालादेखील त्यांनी धन्यवाद दिले.