कामगार संघटनांचा एल्गार 8 जानेवारीला ‘हिंदुस्थान बंद’

केंद्र सरकारने दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले असताना प्रत्यक्षात मात्र पाच कोटी गोरगरीबांच्या हातची रोजीरोटी गेली. शिवाय केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून नव्या कायद्यांमुळे समाजांत धार्मिक तेढ निर्माण झाल्याने तीव्र आंदोलनांचा भडका उडाल्याने नाहक बळी जात आहेत. त्यामुळे कामगार-जनतेच्या हितासाठी, देशाच्या रक्षणासाठी 8 जानेवारीला ‘हिंदुस्थान बंद’चा एल्गार आज कामगार संघटनांनी केला. देशहितासाठी शिवसेनेने या देशव्यापी बंदला पाठिंबा जाहीर केला असून काँग्रेस-राष्ट्रवादीही या आंदोलनात सहभागी होणार आहे
.
केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे सर्वच क्षेत्रांत देशाची पीछेहाट होत असल्याचा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील उपस्थित राहून आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या कष्टकरीविरोधातील धोरणाचा त्यांनी यावेळी निषेध केला. देशातील कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मुंबई-महाराष्ट्राने केल्याचा इतिहास आहे. शिवसेनेने तर नेहमीच कामगारांच्या हिताची भूमिका घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या देशव्यापी आंदोलनाला शिवसेना पाठिंबा देत असल्याचे यावेळी संजय राऊत म्हणाले. ज्या मागण्या आज कृती समिती करीत आहे त्याच मागण्यांसाठी तत्कालीन भाजप आंदोलने करीत होता. आता ते सत्तेत असताना कामगारांना न्याय का देत नाहीत, त्यांच्या मागण्या पूर्ण का करीत नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनीदेखील शिवसेनाप्रणीत सर्व संघटना संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे र. ग. कर्णिक, सहनिमंत्रक विश्वास उटगी, ‘आयटक’चे कॉ. शाम काळे, ‘इंटक’चे जयप्रकाश छाजेड, ‘सिटू’चे डॉ. विवेक माँटेरे, ‘एचएमएस’चे कॉ. संजय वढावकर, ‘एनटीआय’चे कॉ. एम. ए. पाटील, सरकारी कर्मचारी संघटनेचे विश्वास काटकर, सर्व श्रमिक महासंघाचे कॉ. उदय भट, ‘टीयूसीआय’चे ऍड. संजय सिंघवी, ऑईल इंडस्ट्रीजचे नेते प्रदीप मयेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी-कामगार उपस्थित होते.

असे होणार आंदोलन

शिवसेनाप्रणीत सर्व संघटना आपापल्या आस्थापनांसह संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱया नियोजनबद्ध आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. या आंदोलनात सुमारे 50 लाख कामगार सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, तर भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मुंबई विमानतळावर जोरदार आंदोलन करण्यात येणार असल्याचे सूर्यकांत महाडिक म्हणाले. शिवाय आझाद मैदानातही विविध आस्थापनांचे कामगार लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात केंद्र-राज्य शासकीय कर्मचारी संघटना, खासगी आस्थापनांचे कामगार, कंत्राटी कामगार, पालिका कामगार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.

अशा आहेत मागण्या

  • बेरोजगारी-महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा.
  • कामगारांना किमान वेतन 21 हजार रुपये तर किमान पेन्शन 10 हजार रुपये द्या.
  • रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा.
  • ‘मनरेगा’ कामगारांना अधिक दिवस काम व वाढीव दराने रोजगार द्या.
  • स्मामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करा.
  • कायमस्वरूपी रोजगारनिर्मिती, कामगारांना कायम करा.
  • समान कायदा-समान वेतन व अन्य फायद्यांचे धोरण राबवा.
  • देशाच्या विकासासाठी धोरण निश्चित करून अंमलबजावणी करा.
आपली प्रतिक्रिया द्या