
हिंदुस्थानातील अव्वल तिरंदाज अतानु दास व दीपिकाकुमारी यांनी अचूक बाण सोडत जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या रिकर्व प्रकारात उपांत्य फेरीत धडक मारली. दोघांनीही एकेरी गटात अंतिम चारमध्ये मजल मारली. तसेच अतानु दास व दीपिकाकुमारी मिश्र गटातही कांस्य पदकाच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांना लढत देणार आहेत. या स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडू पाच पदके जिंकण्याच्या शर्यतीत आहेत हे विशेष.
दीड वर्षांची प्रतीक्षा संपली
दीपिकाकुमारी हिने जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिला सरळ सेटमध्ये पराभूत करीत आगेकूच केली. या ठिकाणी सुसाटय़ाचा वारा वाहत होता. पण तरीही दीपिकाकुमारी हिने अव्वल दर्जाचा खेळ करीत विजय संपादन केला. या विजयानंतर ती म्हणाली, मला पहिल्या लढतीत चांगली कामगिरी करता आली नव्हती. माझ्या मनामध्ये अनेक विचार सुरू होते. पण एकाग्र राहण्याचा प्रयत्न करीत होते. विजयानंतरही मी नर्व्हस झाले आहे. पण याचसोबत आनंदही आहे. कोरोनामुळे तिरंदाजीपासून दूर होते. दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला स्पर्धेत सहभागी होता आले आहे, असेही ती पुढे म्हणाली. दीपिकाकुमारीसमोर पुढल्या लढतीत मेक्सिको अॅलेक्झॅण्ड्रा वेलेंसिया हिचे आव्हान असणार आहे.
पहिल्यांदाच पदक पटकावण्याच्या शर्यतीत
अतानु दास पहिल्यांदाच जागतिक तिरंदाजी स्पर्धेत पदक पटकावण्याच्या शर्यतीत आहे. कॅनडाच्या एरीक पीटर्सकडून अखेरच्या सेटमध्ये चूक घडली. त्यामुळे अतानु दासने ही लढत 6-4 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, अतानु दास व दीपिकाकुमारी या जोडीने मिश्र दुहेरीत स्पेनच्या जोडीला सहज पराभूत करीत पुढे पाऊल टाकले. पण मेक्सिकोच्या जोडीकडून या जोडीला उपांत्य फेरीत हार सहन करावी लागली.
आता कांस्य पदकासाठीच्या लढतीत अतानु दास व दीपिकाकुमारीसमोर अमेरिकन जोडीचे आव्हान असणार आहे. याशिवाय हिंदुस्थानचा पुरुषांचा व महिलांचा संघही अंतिम आठमध्ये पोहोचल्यामुळे त्यांनाही पदक जिंकता येऊ शकते.























































