जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद, जपानच्या यामागूचीने राखले जागतिक जेतेपद

जपानची महिला बॅडमिंटन स्टार अकाने यामागूचीने घरच्या चाहत्यांचा अपूर्व पाठिंबा मिळवत यंदाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद पटकावत आपले गतविजेतेपद राखले. तिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या चेन युफेईचे तगडे आव्हान 21 -12, 10-21, 21-14 असे संपुष्टात आणत पुन्हा एक प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या भात्यात खोवले.

जपानी स्टार यामागूचीने बॅडमिंटनमधील आपले पहिले मनाचे जगज्जेतेपद स्पेनच्या हुएलवा शहरात झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पटकावले होते. ऑलिम्पिक विजेत्या चेनला पराभूत करण्याचा पराक्रम करीत यामागूचीने आपले जागतिक अजिंक्यपद यंदा राखले आहे.

 यामागूचीची स्पर्धेत निर्विवाद दौड

जपानी स्टार अकाने यामागूचीने यंदा जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारताना प्रतिस्पर्ध्यांपुढे एकही गेम न गमावण्याचा पराक्रम केला होता. पण अंतिम फेरीत ऑलिम्पिक विजेत्या चेनविरुद्ध तिला अंतिम फेरीत दुसरा गेम 10-21 असा गमवावा लागला आहे. मात्र तिसऱया गेममधे यामागूचीने पुन्हा लढतीवर पकड घट्ट करीत 21-14 असा सहज विजय मिळवला. यंदाच्या मार्चमध्ये पटकावलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन जेतेपदानंतर हे यामागूचीचे वर्षातील दुसरे सुपर विजेतेपद ठरले आहे. पुरुषांच्या अंतिम लढतीत सकाळी डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सलसन याने थायलंडच्या कुनलावूट विदितसर्मला 21-5, 21-16 असे पराभूत करीत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.