जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार

बुधवारपासून (27 जानेवारी) बँकॉक येथे बीडब्ल्यूएफ जागतिक टूअर फायनल्सचा धमाका तमाम बॅडमिंटनप्रेमींना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानची मदार असणार आहे शटलक्वीन पी. व्ही. सिंधू आणि स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत या दोघांच्या खांद्यावरच. या दोघांनी या स्पर्धेची पात्रता मिळवली आहे. सात्विक रेड्डी – चिराग शेट्टी तसेच सात्विक रेड्डी व अश्विनी पोनप्पा या हिंदुस्थानच्या जोडींना या स्पर्धेसाठी पात्र ठरता आले नाही. ही स्पर्धा 31 जानेवारीपर्यंत रंगणार आहे.

… म्हणून मिळाली संधी

जागतिक टूअर फायनल्समध्ये जगातील अव्वल आठ रँकिंगमधील बॅडमिंटनपटूंना सहभागी होता येते. एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांसाठी हाच नियम लागू होतो. किदाम्बी श्रीकांतची टूअर रँकिंग 7 असून त्याची जागतिक रँकिंग 14 आहे. पण चीन व जपान येथील खेळाडूंनी कोरोनामुळे थायलंड स्पर्धेमधून माघार घेतली होती. त्यामुळे किदाम्बी श्रीकांतला अव्वल आठ रँकिंगमध्ये राहता आले आणि जागतिक ट्अूर फायनल्समध्ये एण्ट्री
मारता आली.

नशीब आले धावून…

पी. व्ही. सिंधूसाठीही या स्पर्धेसाठी नशीब धावून आले. टूअर रँकिंगमध्ये तीन थायलंडच्या तर एक जपानची खेळाडू होती. या स्पर्धेसाठी एका देशातून दोनच खेळाडूंना संधी दिली जाते. जपानच्या नोझोमी ओपुहरा हिने या स्पर्धेमधून याआधीच माघार घेतली आहे. त्यामुळे पी. व्ही. सिंधूला जागतिक टूअर फायनल्स या स्पर्धेत प्रवेश करता आला. याआधी झालेल्या योनेक्स थायलंड ओपन व टोयोटा थायलंड या दोन्ही स्पर्धांमध्ये पी. व्ही. सिंधूला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आगामी स्पर्धेत ती कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या