जगज्जेत्या महिला क्रिकेट संघाला मिळणार सव्वाशे कोटी

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने रविवारी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून वनडे वर्ल्ड कपचा नवा जगज्जेता होण्याचा बहुमान पटकावत नवा इतिहास रचला. त्यामुळे बीसीसीआयकडून जगज्जेता महिला खेळाडूंवर बक्षिसांची बरसात होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बोर्ड महिला संघाला पुरुष संघाइतकीच बक्षीस रक्कम देण्याचा विचार करत आहे.

बीसीसीआयचे माजी सचिव आणि सध्याचे आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्या ‘समान वेतन धोरणा’चा विचार करून हा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यावर 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आता महिला संघ जिंकल्यास त्यांनाही तितकीच रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “बोर्ड पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतनाचे समर्थन करतो. त्यामुळेच आमच्या मुलींनी जर विश्वचषक जिंकला तर त्यांच्या बक्षीस रकमेवर कोणतीही तडजोड होणार नाही, मात्र अंतिम सामन्यापूर्वी याबाबत अधिकृत घोषणा करणे योग्य ठरणार नाही.’’

2017 साली इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना गमावल्यानंतरही हिंदुस्थानी महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. त्यामुळे जगज्जेत्या हरमनप्रीत काwरच्या टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला मिळणारी रक्कम किमान दहा पट अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.